Wednesday, November 27, 2024

गिव टू रिसीव २

गिव टू रिसीव - २ तुर्की मधील इस्तांबुल शहरातला आमचा ४ था आणी शेवटचा दिवस. रात्री ८ ला मुंबईला जाणारं विमान होतं. हॉटेल रूमचं चेकआउट सकाळी अकराचं असल्यामुळे ९ ला चेकआउट करून सामान स्टोरेज रूम मधे ठेवलं आणी बाहेर पडलो. ४ वाजता एअरपोर्टला जाण्याकरता टॅक्सी सांगितली होती. ६-७ तास होते फिरायला. हागिया सोफिया म्हणून ५३० साली बांधलेलं त्या काळातलं सगळ्यात मोठं चर्च होतं. त्याची १४५३ मधे तुर्की आक्रमणानंतर मशिद झाली. त्यात १५०० वर्षांच्या इतिहासाच्या खुणा आजही आहेत. तिथे गेलो. मग टर्किश रेस्टोरंट मधे काही छान निवडक शाकाहारी डिशेसचा आस्वाद घेतला. नंतर एका दुकानातून घरी नेण्यासाठी बकलवाचे (स्वीट्स) बॉक्स घेतले. त्याचं बिल भरताना म्हटलं जवळ जी काही कॅश आहे (टर्किश लीरा) ती संपवू आणी मग उरलेले पैसे कार्डानी भरू. ते लीरा खिशात राहिले तर परत गेल्यावर त्याचा नुसता कागद होतो. ३ वाजता हॉटेलला आलो आणी लॉबी मधे बसलो कारण रूम मधून चेकआऊट सकाळीच केलं होतं. तिथे योगायोगाने पुण्याचा एक जण भेटला. ५ मिनिटं बोललो त्याच्याशी. मग म्हटलं आपली पाण्याची बाटली भरून घ्यावी. ५ तास उन्हात फिरून तहान लागली होती. होटेलमधे ब्रेकफास्ट एरिया मधे जाऊन तिथल्या कूलरवर बाटली भरून घ्यायला निघालो. हॉटेलच्या एकाने जिन्यातंच अडवत म्हटले कि तुम्ही आत्ता खाली जाऊ शकत नाही. त्याला म्हटलं, “पाणी भरून घ्यायला जातोय.” तर म्हणाला “नाही, तुम्हाला पाण्याची बाटली विकत घ्यायला लागेल, किंमत २ यूरो” म्हणजे साधारण ७५ लीरा. (टूरिस्ट एरियातले हॉटेलवाले यूरोची मागणी करतात. तेवढीच त्यांची एक्स्ट्रा कमाई होते). हॉटेल शेजारच्या छोट्या दुकानात पाण्याच्या बाटलीची किंमत १० लीरा होती. पण आम्ही आधीच जवळचे सगळे लीरा संपवलेले. परत लॉबी मधे आलो, म्हटलं “काय लूट आहे ही..” पण पाणी तर हवं होतं. हे आमचं बोलणं त्या नुकत्याच भेटलेल्या मराठी मित्राने ऐकलं. तो म्हणाला “काही २ यूरो वगेरे देऊ नका.” त्याने त्याच्या पाकिटातून १० लिराची नोट काढून दिली पाणी आणायला. आम्ही त्याला त्या बदल्यात १ डॉलरची नोट देऊ केली ती त्याने नाकारली. मग शेजारच्या दुकानातून १० लीराची पाण्याची बाटली आणली, त्याचे आभार मानले आणी टॅक्सी आल्यावर एअरपोर्टला गेलो. त्या अनोळखी माणसाच्या छोट्या मदतीने मन सुखावलं होतं. जगात माणुसकी शिल्लक आहे अजून ह्याची जणू एक खूण मिळाली होती. मग शांतपणे विमानात बसल्यावर २ दिवसांपुर्वीचा किस्सा आठवला आणी पुन्हा एकदा आपल्या युनिवर्सल बँकेतल्या खात्याची आठवण झाली. त्या दिवशी आम्ही इस्तांबूल मधील बलत एरियामधे फिरायला गेलो होतो. तो भाग खूप चढ-उतार असलेला आहे. आघीच चढ चढून फासफूस होत होती त्यात चांगलाच उन्हाळा होता. सगळा रेसिडेंशियल एरिया होता. रस्त्यावर फ़ार कोणी नव्हतं. चालता चालता एक दुकान दिसलं. भारतात छोटं वाण्याचं दुकान असतं तसं दुकान होतं. तिथे थंड पाण्याची बाटली घ्यायला गेलो आणी अचानक कुठुनसा एक ७-८ वर्षाचा मुलगा आला आणी त्या दुकानातल्या फ्रिजकडे बोट दाखवून “सू… सू” असं म्हणायला लगला. तुर्की भाषेत पाण्याला “सू” म्हणतात. मुलगा भिकारी वाटंत नव्हता. खरं तर ४ दिवसाच्या इस्तांबुल मधल्या वास्तव्या मधे आम्ही एकही भिकारी बधितला नव्हता. तो तिथेच कुठेतरी रहात असावा. कोणी पाणी मागतलं तर नाही म्हणू नये असं म्हणतात, पुढचा जन्म गाढवाचा मिळतो. आम्ही आत जाऊन पाणी आणी १-२ वस्तु घेतल्या. त्या मुलाला द्यायला पण एक बाटली घेतली. बाहेर आलों तर आधी तो दिसला नाही. थोडं शोधल्यावर दिसला. त्याला पाण्याची बाटली देऊन तिथुन निघालो. जरा विचित्र वाटलं खरं. तिथेच राहत असेल तर घरी जाऊन पाणी पिऊ शकला असता, आणी पाणी मागुन गायब कुठे झाला? असो. ह्या छोट्याश्या किश्श्याचा विसरंच पडला होता खरं तर. पण काय कमाल आहे नाही? आम्हाला पण बरोब्बर पाण्याचीच गरज पडावी आणी कुणी अनोळखी माणसानी द्यावं. अर्थात नाईलाज झाला असता तर आम्ही २ यूरो कार्डानी दिले असते. पण तशी गरज पडली नाही कारण आमचे १० टर्किश लीरा यूनिवर्सल बँकेत जमा झालेले होते ते परत मिळाले. ते ही टर्की सोडायच्या आधी. ह्या बँकेत पैसे जमा होतातंच, पण ताहानलेल्याला थंड पाणी प्यायल्यावर मिळालेलं समाधान? ते ही जमा होतं. परत मिळतं. हे खातं उघडायला लागंत नाही. आपलं सगळ्यांच असतं. तुमच्या खात्यात पण जे काही जमा असेल ते गरजेला नक्की मिळेल. 😇

No comments: