Wednesday, November 27, 2024
गिव टू रिसीव
“आपल्याला असं काही कधी मिळत नाही” असं म्हणत नवर्याने लकी ड्रॉ चं तिकीट वेट्रेस कडे दिले. एका restaurant मधे जेवायला गेलो होतो तिथे त्यांचा customer appreciation weekend होता. दर तासाला एका कस्टमर ला $२५ चं गिफ्ट कार्ड मिळणार होतं. दुपारी १२:३० ची वेळ, गर्दी होती. आपला नंबर कुठला लागतोय असं त्याचं म्हणणं.
ह्याच्या अगदी चारंच दिवस आधीची गोष्ट. माझ्या ॲाफिस मधे एकीनी लंच आणलं नव्हतं. रोज ती काहीतरी सॅलड किंवा हॅम सॅंडवीच असं काहीतरी आणायची. त्या दिवशी तिला वेळ झाला नाही. आता अशा वेऴी आपल्याकडे किती सोपं असतं, “माझ्या डब्यातली एक पोळी घे” असं म्हणू आपण. पण इथे असं नाही ना. सगळे जण गप्पा मारत जेवणात दंग, पण माझं मन राहीना. तीला म्हटलं “तू इथलं कॅफे मधलं खात नाहीस का?” कुणास ठाऊक, काही ॲलर्जी वगैरे असेल. तर म्हणाली, “तसं नाही, आमचं बजेट टाइट आहे सध्या. जराही extra पैसे खर्च करणं जमणार नाहीये आत्ता.” जेवणासाठी पाच एक डॉलर खर्च करायला इतका विचार? मला काही पटेना. “you carry on. I am OK” असं म्हणून ती फोन वर मग्न झाली.
Ok कशी असेल. तिचा फोन स्मार्टफोन पण नव्हता. फोनवर बिझी असल्याचं नाटक करत होती स्पष्ट. सगळे मनमुराद गप्पांमधे मग्न, माझ्या घशाखाली घास उतरेना. क्षणात निर्णय घेत तिला म्हटलं “तु प्लीझ काहीतरी घे, मी पे करते” आधी २ वेळा नको म्हणाली. मग म्हणाली “Are you sure?” म्हटलं “Yes.” मग जाऊन बरीटो घेऊन आली. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. १० वर्ष गॅप नंतर जॉबला लागले होते, पण मन ग्रुहिणीचंच होतं. कोणी उपाशी राहिलेलं कसं बघवेल? आपल्या संस्क्रुतीत तरी कुठे बसतं हे? भारतातून आपण ह्या ‘श्रीमंत’ देशात येतो तेव्हा काही कल्पना असतात आपल्या. त्या हळु-हळु मोडीत निघतात. विषयांतर होईल म्हणून ह्यावर फार नाही लिहित, पण आपण खरंच average अमेरीकन लोकांपेक्षा जास्त सुस्थितीत आहोत हे मला एकंदरीतच जाणवलं.
तर त्या रेस्टॉरंट मधे आमचं जेवण आटपत आलं होतं आणी १ वाजता विनर डिक्लेअर करणार होते. मी म्हटलं, “आज मिळेल आपल्याला हे गिफ्ट कार्ड” माझा confidence पाहुन मुलगी हळु आवाजात म्हणाली, “आई तू काही cheating केलियेस का?” म्हटलं “छे गं, cheating कसं करीन?” झालं असं होतं कि मला एक पुस्तक वाचलेलं आठवलं, The Game of Life and how to play it - by Florence Scovel Shinn. बरंचसं spirituality आणी बायबल मधल्या concepts वर आहे. आपण कायम ऐकत आलेल्या गोष्टीं आहेत तशा, “पेरावे तसे उगवते” वगैरे. पण ते छान मांडलंय पुस्तकात. तर त्यात law of prosperity आहे - ‘गिव्ह टू रिसीव्ह’. prosperity फक्त पैसे ह्या अर्थाने नाही तर बाकी मैत्री, प्रेम, प्रशंसा, मदत सगळंच - दिलेलं कितीतरी पटीने परत येतं. ह्या concept वर बरंच लिहीलं, बोललं गेलय, पण मी हे पुस्तक नुकतंच वाचलं असल्याने तेच आठवलं.
ह्या तत्त्वाची निगेटिव बाजु मात्र मला तशी लहानपणीच जाणवली. कॉलेजच्या काळात एकदा मला आणी माझ्या मैत्रिणीला एक पर्स मिळाली. ती कोणाची आहे हा विचार न करता आम्ही खूष झालो आणी दोघींनी त्यातल्या वस्तू वाटुन घेतल्या. पैसे नव्हते फार, पण मेक-अप वगैरे च्या वस्तू होत्या. कर्म फळाला यायला फार वेळ लागत नाही म्हणतात आणी त्या वेळेसही नाहीच लागला. लगेचंच पुढच्या महीन्यात मी आणी दुसरी एक मैत्रीण शिवथर घळीत शिबीराला गेलो होतो. तिथुन येताना एसटीत अंताक्षरी, धमाल मस्तीच्या मूडमधे मी तिकीट काढलेलं आमच्या ग्रुप मधल्या एकाच्या खिशात ठेवायला दिलं - temporary - पर्स लांब होती आणी १ मिनीटाचा खंड कसा पडु देणार अंताक्षरीत? काही वेळानी तो महाडला उतरुन गेला आमच्या मुंबई पर्यंतच्या तिकीटासह. माझ्या मैत्रिणीचं तिकीट पण मीच ‘जबाबदारीने’ ठेऊन घेतलं होतं. बरं अशा वेळी गप्प बसायचं का नाही? तर मी ओरडले “oh no, सारीका..आपलं तिकीट सुहास दादाच्या खिशात राहीलं…” झालं. आला conductor धावत “परत तिकीट काढा नाहीतर उतरा.” आम्ही दोघी अगदी रडकुंडीला आलो. अजिबात दया-माया दाखवली नाही त्याने १६-१७ वार्षाच्या मुलींवर. ८० रुपयाचं एक तिकीट, १६० रपये देऊन परत तिकीट काढलं आणी ते ह्या वेळेस सारीकाने सांभाळुन ठेवलं. हुश्श!
अर्थात त्या वेळेस काही ही सांगड घातली नाही, conductor च्या नावाने बोटं मोडली फक्त. पण नंतर काही काळानी साक्षात्कार झाला, “ह्या दोन भिन्न घटना, पण ह्या निगडीत असतील? कर्म? Cause and effect?” ह्या ओघाने विचार करता करता आणखी असे लहानमोठे किस्से आठवले, लबाडीचे आणी नुकसानीचे. coincidence असेल का? असेल. पण माझ्या मनात नव्हता. त्यानंतर काही महिन्यांनी एकदा PCO वरुन फोन केला आणी पैसे द्यायला विसरले. बसची वेळ झाली म्हणून घाईत निघाले आणी अर्ध्या वाटेत आठवलं तशी परत धावत जाऊन पैसे देऊन आले. हे २ रुपये बुडवले तर ऊद्या होणारं १० रुपयाचं नुकसान दिसत होतं डोळ्यासमोर.
‘ गिव्ह टू रिसीव्ह’ च्या concept वर आणखी थोडं लिहीणं भाग आहे इथे. आपल्याशास्त्रातही आहेच सत्पात्री दानाचं महत्त्व. माझे बाबा तर म्हणतात “‘मी दिलं’ किंवा ‘मी केलं’ असं म्हटलं कि तिथेच त्याची किंमत शून्य झाली. आपण कोण देणारे?” ही आणखी वरची अध्यात्मिक पातळी झाली. एक किस्सा सांगितल्या शिवाय राहवत नाही. एकदा लहानपणी मी आणी एका मैत्रिणीने कंपॉस बॉक्स exchange केली. गंमत म्हणून. २ दिवसांनी तिला तिची कंपॉस परत हवीशी वाटली. पण मला द्यायची नव्हती. तिने तिच्या आईला सांगितलं. तिची आई तिला म्हणाली, “एकदा का आपण कोणाला वस्तु दिली कि त्यातली attachment काढुन घ्यायची. ती कंपॉस बॉक्स आता तुझी नाही. तिने ती कशीही वापरली, फेकुन दिली तरी आता तुझा अधिकार नाही.” दुसरी कोणी आई असती तर टीचर कडे गेली असती भांडायला. माझ्या मात्र ही गोष्ट चांगलीच लक्षात राहिली.
तुमच्या लक्षात आलाच असेल ओघ, ते गिफ्ट कार्ड खरोखर आम्हाला मिळालं. तरी मुलगी म्हणतंच होती, “तुला कसं माहीत?” अर्थात, त्या गिफ्ट कार्डावर माझं काहीच अडलं नव्हतं. नाही मिळालं तरी आम्ही काही नाराज होणार नव्हतो, “आपल्याला असलं काही मिळत नाही, एवढं कुठलं आलय आपलं ‘लक’?” हे पालुपद पण सेफली चालु ठेवलं असतं. मी अगदी कोणी दानवीर वगैरे आहे असं मला म्हणायचं नाही, अजिबातंच नाही. आपल्या सगळ्यांनाच असे अनुभव येत असतील. फक्त आपण फायदा-नुकसानीकडे ह्या द्रुष्टीनी बघत नाही. सगळं गुड/ बॅड लक म्हणून मोकळे होतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment